पाटबंधारे कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या त्या शेतकऱ्यांचा मृत्यू
बीड : प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाकडून न्याय मिळत नसल्याने निराश झालेल्या अर्जुन कुंडलिक साळुंके या शेतकर्याने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.24) दुपारी घडली होती. 90 टक्के भाजलेल्या त्या शेकऱ्याचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी प्रेत ताब्यात नकार दिल्याने तणाव वाढला आहे.
बीड तालुक्यातील पाली येथील शेतकरी अर्जुन साळुंके हे पाटबंधारे कार्यालयाकडून अन्याय झाल्याने निराश झाले होते. त्यांनी न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. परंतु आत्मदनाचा इशारा देऊनही दखल घेतली जात नसल्याने अर्जुन साळुंके या शेतकर्याने मंगळवारी बीड येथील पाटबंधारे कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. यात ते 90 टक्के भाजले होते. प्रकृती गंभीर असलेल्या या शेतकऱ्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना बुधवारी (दि.25) सकाळी सदरील शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
संपादित जमीनीचा प्रश्न
बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्याची जमीन पाटबंधारे विभागाने संपादीत केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे. गेल्या अनेक वर्षापासून साळुंके हे पाटबंधारे विभाग कार्यालयात खेटे मारत होते पण त्यांना न्याय मिळला नाही.
