girl run in shelter home

बीडमध्ये अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचे अंबाजोगाईच्या सुधारगृहातून पलायन;
सुधारगृहाने दिली शहर पो.स्टे.ला तक्रार; अंधाराचा फायदा उठवत 10 फूट उंच गच्चीवरुन तिनी मारली उडी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)ः
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर बीडच्या न्यायालयाने सदर पिडीत मुलीला अंबाजोगाईच्या सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिल्यानंतर तिने शुक्रवारी सायंकाळचे जेवण केल्यानंतर हात धुण्याच्या बहाण्याने अंधाराचा फायदा उठवत पाणी शुद्धीकरण केंद्राच्या यंत्रावरुन गच्चीवर चढत खाली उडी मारत पोबारा केला. सुधारगृहाच्या कर्मचार्‍यांनी रात्रभर परिसराचा शोध घेतला असता सदरील मुलगी आढळून न आल्याने शहर पोलीसात याची नोंद करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील पारधी समाजाच्या या पिडीत मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार बीड ग्रामीण पो.स्टे.ला दाखल झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर उलट जवाबामध्ये पिडीत मुलीने आपण संमतीने प्रियकरासोबत संबंध ठेवले होते. मात्र आईच्या दबावापोटी आपण गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीसी जवाबात म्हटले आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बीडच्या न्यायालयात पिडीत मुलीला हजर केले असता न्यायालयाने संबंधीत पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने तिला बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेशीत केले. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अंबाजोगाई येथील वसुंधरा सेवा प्रतिष्ठाण संचलित सावित्रीबाई फुले मुलींचे निरीक्षण गृहामध्ये 20 नोव्हेंबर रोजी दाखल केले. तेव्हापासून ही मुलगी विविध बहाणे करुन पळून जाण्याची युक्ती शोधत होती. दोन दिवसांपासून माझे डोके दुखते, ताप येते, मला दवाखान्यात न्या, अन्यथा मी येथून पळून जाईल अशी धमकी सुधारगृहातील कर्मचार्‍यांना देत होती. शुक्रवारच्या सायंकाळी 6-30च्या सुमारास या सुधारगृहातील मुलींना जेवण देण्यात आले. जेवण केल्यानंतर सदरील पिडीत मुलीने आपले ताट धुण्याच्या बहाण्याने पाण्याच्या फिल्टरकडे गेली. सुधारगृहात अंधार असल्याचा फायदा घेत पाण्याच्या फिल्टरच्या पाईपावरुन गच्चीवर चढून 10 फूट उंच गच्चीवरुन तिनी बाहेर उडी घेत पोबारा केला. त्यामुळे सुधारगृहातील अधिकारी व कर्मचार्‍यांची भंबेरी उडाली. बॅटरीच्या सहाय्याने परिसरात तिचा शोध घेण्यात आला. परंतू ती मिळून आली नाही. शेवटी शहर पो.स्टे.ला पिडीत मुलगी पळून गेल्याची नोंद सुधारगृहातील अधिकार्‍यांनी केल्याचे सांगीतले.

दोन दिवसापासूनच ती अस्वस्थ होती…
गुरुवारपासून ती विविध बहाणे करुन बाहेर निघण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होती. गुरुवारीतर तिने हद्द केली. सुधारगृहातील झाडावर चढून मी आत्महत्या करेल, मला बाहेर सोडा अशी म्हणू लागली. परंतू अधिकार्‍यांनी तिची समजूत काढत झाडावरुन खाली उतरवले. मात्र शुक्रवारी सायंकाळचे जेवण केल्यानंतर ताट धुण्याच्या बहाण्याने सर्वांचा डोळा चुकवत तिने पोबारा केला.-
ओमकार आकुसकर,
प्रभारी अधिक्षक,सावित्रीबाई फुले मुलींचे निरीक्षणगृह, अंबाजोगाई.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started